More
    Homeरणनीतीराज कि बात 

    राज कि बात 

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरून म्हणजेच दादरच्या पार्कमधल्या सभेतून मोदींसाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा देत, एनडीएमध्ये सामील झाल्याचे जाहीर केले. अनेक मनसैनिकाचा आपल्या साहेबांनी घेतलेल्या भूमिकेमुळे कदाचित भ्रमनिरास झालेला असावा. कारण, राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेला पूर्वीप्रमाणे टाळ्यांचा कडकडाट लाभलेला दिसून आला नाही. राज ठाकरे अत्यंत सावधपणे भाषण करत आहेत, असे जाणवले. नेहमीप्रमाणे बेदरकारपणा किंवा एखाद्याला अंगावर घेण्याचा आवेश त्यात नव्हता. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी “लाव रे तो व्हिडीओ” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधी भूमिका घेणारे राज ठाकरे भाजपासोबत का गेले असावेत? शिवाय केवळ एक आमदार पाठीशी असलेल्या मनसेला केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने एनडीएमध्ये का समाविष्ट केले असावे? हे उभ्या महाराष्ट्राला पडलेले कोडे आहे. 

    मनसेच्या निवडणुकीचे राजकारण 

    माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे, असा आरोप करून २००६ साली राज ठाकरे यांनी शिवसेनेनला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या वर्षभरापूर्वी माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ भाजप नेते नारायण राणे यांनी सेनेतून बाहेर पडून काँग्रेसची वाट धरली होती. राणे आणि राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना कंटाळून पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आज १८ वर्षांच्या असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची २००९ ते २०१२ दरम्यानच्या निवडणुकांमध्ये खूप मोठी हवा होती. त्यावेळी २००९च्या विधानसभा निवडणुकीत नवख्या असलेल्या मनसेने राज ठाकरेंच्या करिष्म्यावर तब्ब्ल १३ जागा जिंकल्या होत्या. शिवाय खासदारकीच्या निवडणुकीत सेना-भाजपचे अनेक उमेदवार मनसेमुळे पडले होते. मुख्य म्हणजे, २०१२ साली नाशिक सारख्या महानगरात पक्षाला एकहाती सत्ता मिळाली. तर पुणे महापालिकेत २९, बृहन्मुंबई महापालिकेत २८,या सह ठाणे,उल्हासनगर,पिंपरी-चिंचवड,अकोला, नागपूर अशा महापालिकेत खाते उघडून आपले काही नगरसेवक निवडून आणले होते. मात्र, ज्या वेगाने मनसेची भरभराट झाली, तितक्यच वेगाने या पक्षाला लोकांकडून मिळणार पाठिंबा ओसरू लागला. मोदी लाटेत पक्षाच्या आमदारांची संख्या १३ वरून ०१ इतकी रोडावली. नाशिक महापालिकेची सत्ता हातून गेली. प्रवीण दरेकर, राम कदम अशा अनेक नेत्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शिरीष पारकर यांच्यासारखा पक्षाची खिंड लढवणार अभ्यासून नेता अचानक दिसेनासा झाला. या सगळ्याला राज ठाकरेंचा लहरी स्वभाव आणि संगठनकडे दुर्लक्ष या मुळे घडले. मात्र या खेरीज वैयक्तिक पातळीवर राज ठाकरेंच्या आयुष्यात काही घडामोडी घडल्या. ज्याचा विपरीत परिणाम राज ठाकरे आणि मनसेवर झाला, असे त्यांना जवळून ओळखणारे लोक सांगतात. 

    कौटुंबिक पातळीवर संघर्ष 

    लोकसभा २०१४ ची निवडणूक तोंडावर आलेली असताना राज ठाकरे यांचे चिरंजिव अमित ठाकरे यांना एका आजाराने ग्रासले होते, असे बोलले जाते. पुढे परदेशात त्यांच्यावर योग्य ते उपचार होऊन अमित ठाकरे खडखडीत बरे झाले. मात्र, यामुळे राज ठाकरे पुरते खचून गेले होते. त्यानंतर दुसरी घटना घडली ज्यामुळे राज ठाकरे पुरते हादरून गेले होते. ठाकरेंचे श्वानप्रेम हे सगळ्यांनाच माहीत आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना देखील कुत्रे पाळण्याची हौस होती. राज ठाकरेंचे आपल्या कुत्र्यांबरोबरचे अनेक व्हिडीओ व फोटोज व्हायरल झालेले आहेत. मात्र, याच राज ठाकरेंच्या घरातील पाळीव कुत्र्याने त्यांची सुविद्य पत्नी शर्मिला राज ठाकरे यांचा चावा घेतला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार यानंतर शर्मिला ठाकरे गंभीर जखमी झालेल्या होत्या. तिसरी घटना राज ठाकरेंची मुलगी उर्वशी ठाकरे हिच्या सोबत घडली होती. उशिरा रात्री स्कुटी चालवताना उर्वशीचा मुंबईत अपघात झाला होता. यासगळ्या घटना एकापाठोपाठ घडल्या असल्याने राज ठाकरेंवर याचा वाईट परिणाम झाला होता, असे बोलले जाते. 


    मनसेने भाजपला पाठिंबा का दर्शवला असावा? 

    २०१९ च्या निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधी रान पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने मतपेट्यांमध्ये फारसा फरक पडला नाही. उलट भाजपने स्वबळावर ३०३ खासदार निवडणून आणले, तर एनडीएने ३५४ जागांवर मुसंडी मारली. शिवाय महाराष्ट्रात महायुतीचे ४८ पैकी ४१ खासदार निवडून आले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान मनसेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आघाडी पासून लांब ठेवले. विधानसभा निवडणुकी नंतर देखील महाराष्ट्राने महायुतीला कौल दिलेला असताना शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना गळाला लावून महाविकास आघाडीची निर्मिती केली. मात्र, ज्या राज ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा लोकसभेसाठी प्रचार केला होता. त्यांच्या मनसेला माविआमध्ये सामावून घ्यायचे टाळले. उलट पक्षी भाजपने लोकसभा,राज्यसभा व विधानपरिषदेची प्रत्येकी एक जागा शिवाय विधानसभा व महापालिकेत चांगल्या जागा देण्याची तयारी भाजप-शिवसेनेच्या वतीने दर्शवली असल्याची माहिती मिळते. पैकी लोकसभा लढवायची की नाही याबाबत मनसेमध्ये मतमतांतर असल्याचे बोलले जाते. मात्र, पक्षाला आलेली मरगळ विचारत घेता. मनसेने महायुती बरोबर जाणे फायद्याचे आहे असे मत अभयासक व्यक्त करतात. कारण सध्या मनसेची उमेदवार निवडून आणण्याची ताकद कमी आहे. शिवाय संगठन बांधणी गरजेची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कुठलाही राजकीय पक्ष चालवण्यासाठी रिसोर्स किंवा फंड लागतो. अमेरिकन निवडणूक प्रक्रियेत लॉबिंग नावाच्या प्रकाराला कायदेशीर मान्यता आहे. आपल्या देशात लॉबिंगला कायदेशीर मान्यता नसली तरी अनेक उद्योगपतींकडून फंड मिळवले जातात. सध्या इलेक्टॉल बाँड्सवरून राजकारण चांगलेच तापलेले आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार भाजपला सर्वाधिक फंड मिळालेला आहे व त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा क्रमांक लागतो. थोडक्यात निवडणूक लढवण्यासाठी रिसोर्स किंवा फंडिंगची गरज भासते. कुठेही सत्तेत नसलेल्या मनसेपुढे पक्ष चालवण्यासाठी लागणारा रिसोर्स उभा करण्यावर मर्यादा येत असाव्यात. त्यामुळे सत्तेसोबत गेल्यास बरेचसे प्रश्न सुटू शकतात. 

    अदृश्य शक्तीला राज ठाकरे का महत्त्वाचे वाटत आहेत? 

    यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भाजप लोकसभेची दुसरी टर्म पूर्ण होऊन पक्ष तिसऱ्यांदा निवडणुकीला समोरा जात आहे. खरे तर दहा वर्षांच्या केंद्रातील सत्तेमुळे अँटी इंकम्बसीचे खूप मोठे सावट असायला हवे होते. भाजपला २७२ हा बहुमताचा आकडा पार करता येईल की नाही असे वातावरण असावयास हवे होते. मात्र, ४०० पारचा नारा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील वातावरण बदलून टाकले. विरोधी पक्षसुद्धा २७२ ऐवजी भाजप ४०० पार करणार की नाही यामध्ये अडकला. मात्र भाजपचे चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गृहमंत्री अमित शाह यांचे सगळीकडे लक्ष आहे. उत्तरप्रदेशात चांगली कामगिरी करणाऱ्या भाजपने २०१४ व २०१९ च्या निवडणुकी दरम्यान अपना दल सारख्या छोट्या पक्षाशी युती केली होती. जातीय गणिते व समजतील सगळ्या घटकांना सत्तेत सामावून घेणे हे भाजपच्या विजयाचे मुख्य सूत्र असल्याचे बरयाचदा दिसून येते. महाराष्ट्रातील विविध भागात राज ठाकरेंबद्दल आत्मीयता वाटणारे अनेक मतदार आहेत. मात्र हे मतदार विखुरलेले आहेत. ज्याचा निश्चितच महायुतीला फायदा होऊ शकतो. विशेषतः मुंबई,पुणे,ठाणे, संभाजी नगर अशा महानगरात मनसेची अजूनही ताकद आहे. जी भाजपच्या कामी येऊ शकते.   

    राज ठाकरेंचा हिंदुत्वाचा डीएनए 

    आपल्या भाषणात शिवसेनेनंतर माझा भाजपसोबत सर्वाधिक संबंध आल्याचे राज ठाकरेंनी नमूद केले. देवेंद्र फडणवीस किंवा नितीन गडकरी अशा भाजपच्या बड्या नेत्यांसोबतचे राज ठाकरेंचे संबंध हे कायमच मैत्रीपूर्ण राहिलेले आहेत. आणखीन एक धागा भाजप आणि राज ठाकरे यांच्यात सामान आहे. तो म्हणजे हिंदुत्व. राज ठाकरेंची पाहिल्यापासूनची भूमिका ही हिंदुत्वाला साजेशी राहिलेली आहे. भले प्रांतीय अस्मितेचे राजकारण राज ठाकरेंनी केले असेल परंतु २०१२ साली रझा अकादमीच्या मोर्च्यानंतर जिहादी मनोवृत्तीच्या काही लांडग्यांनी मुंबईत धुमाकूळ घातल्यावर राज ठाकरेंनी आजाद मैदानावर सभा घेऊन त्याचा विरोध दर्शवलेला होता. इतकेच नाही तर काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर राज ठाकरेंनी ट्विट करून अभिनंद केले होते. एनआरसी किंवा सीएएचे राज ठाकरेंनी समर्थन केलेलं आहे. शिवाय मशिदीवरचे भोंगे काढण्याचे आंदोलन किंवा अरबी समुद्रातील माहीम किनारपट्टया लगतची अनधिकृत मजार उजेडात आणणे असेल राज ठाकरेंचा डीएनए हा हिंदुत्वाचा आहे.  

    एकंदरीत इतिहासात डोकावून पाहिल्यास हिंदुस्थानातील आपापसातील वादामुळे बाह्य आक्रांत्यांनी देशावर अनेक शतके राज्य केलं. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत सुद्धा मराठ्यांना उत्तरेतील जाट,राजपूत व मुसलमान इत्यादी स्वदेशी राज्यकर्त्यांचे पाठबळ न लाभल्याने अब्दालीचा विजय झाला. भाजप या इतिहासापासून धडा घेत हिंदुत्ववाद्यांमधील हेवेदावे बाजूला ठेवून एकछत्री अंमल प्रस्थापित करू पाहतो आहे. त्यातूनच कोणेएके काळी मोदी-शहांवर टोकाची टीका करणाऱ्या राज ठाकरेंना एनडीएमध्ये सामील करून घेतले. सोबतच आपल्या भाषणात म्हंटल्याप्रमाणे राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांच्यावर वैयक्तिक पातळीला जाऊन टीका केलेली नव्हती. जी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी केली. म्हणूनच आज राज ठाकरे महायुतीसोबत असावेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img