More
    Homeराजकारणमोदी सरकारसाठी ४०० पार शक्य कि अशक्य?

    मोदी सरकारसाठी ४०० पार शक्य कि अशक्य?

    मोदी सरकारसाठी ४०० पार शक्य कि अशक्य?

    भूतपूर्व पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या १९८४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ४०४ जागा जिंकल्या. त्यानंतर तीस वर्षांनी म्हणजेच २०१४ साली पहिल्यांदा भाजपच्या रूपाने कुठल्या तरी एका पक्षाला २८२ च्या जादुई आकड्याला स्पर्श करता आला. तब्ब्ल तीन दशकांनंतर पहिल्यांदा भारतीय जनतेने कुठल्या तरी एका पक्षाकडे एकहाती सत्ता सोपवली. मात्र हे एका रात्रीत घडलेले नाही. मधल्या तीस वर्षात देशाने प्रचंड उलथापालथ पाहिली होती. पंतप्रधानपदी विराजमान झालेले व्ही.पी. सिंग, चंद्रशेखर, सोळा दिवसांचे पडलेले व एकोणीस महिन्यांचे सरकार चालवणारे अटलजी आणि त्यांचे “सरकारे आती है। जाती है।” हे अजरामर भाषण. निव्वळ ४६ खासदार पाठीशी असून पंतप्रधान झालेले देवेगौडा, इंदरकुमार गुजराल. ममता दीदी आणि इतर मित्रपक्षांना सांभाळण्याची कसरत करणारी एनडीए. २००८ साली इंडो-यूएस न्यूक्लिअर डीलमुळे पाठिंबा काढून घेणारी लेफ्ट. अण्णांचे लोकपाल आंदोलन. “राजनीती सडगई है” म्हणत हाती झाडू घेऊन निवडणुकीच्या राजकारणात उडी घेणारे अरविंद केजरीवाल. जे केजरीवाल कोणे एकेकाळी दारू बुरी चीज है असे म्हणायचे आज ते त्याच मद्य घोटाळ्यावरून जेलमध्ये गेले आहेत. बहुपक्षीय लोकशाही आणि विविध धर्म-पंथ किंवा जाती-पातीत विभागलेल्या या देशाने अँटी इंकंबसी असूनही २०१९ साली दुसऱ्यांदा मोदींच्या हाती सत्तेचा शकट दिला. आज त्याच मोदींनी ४०० पारचा नारा दिलेला आहे. पण खरंच हे शक्य आहे का? येत्या काळात देशाचा कौल काय असेल? याची कारण मीमांसा आम्ही या लेखाच्या माध्यमातून करणार आहोत. 

    काम्यूनिजम किंवा समाजवादाकडून हिंदुत्ववादाकडे चाललेला देश.  

    १९२५ साली जग ग्रेट डिप्रेशन म्हणजेच जागतिक महामंदीच्या उंबरठ्यावर उभे होते. तर भारतामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय स्वयं सेवक संघ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने आंबेडकरी विचार रुजत होता तो याच वर्षी. भारताच्या राजकारणाला आकार देणाऱ्या या तिन्ही विचारधारांची मुहूर्तमेढ झाली ती १९२५ साली. योगायोग असा कि आजही भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या या महत्वाच्या विचारधारांचे उगमस्थान महाराष्ट्र आहे. १९२० च्या दशकात एम.एन.रॉय यांनी कम्युनिज्म भारतात आणला आणि तो डांगे,रणदिवे या जोडगोळीने पुढे वाढवला. नागपुरातल्या भिडेवाड्यात काही तरुणांना सोबत घेऊन डॉ. हेडगेवारांनी संघ स्थापन केला आणि मुंबई-महाराष्ट्रतुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरानीं दलित चळवळीचा हुंकार केला. पण या तिन्ही विचारधारांची आजची स्थिती काय? केरळ वगळता कम्युनिस्ट इतर ठिकाणी हद्दपार झालेले दिसतात. ७०-८० च्या दशकात प्रचंड दबदबा असणारी आंबेडकरी चळवळ किंवा सत्ताकारणात महत्वाची भूमिका बजावणारा बहन मायावतींच्या बहुजन समाजवादी पक्षासारखे अनेक पक्ष गलीतगात्र झालेले दिसतात. दुसरीकडे आज समाजवादी जात्यात आणि काँग्रेस सुपात अशी अवस्था आहे. आणि या सगळ्यात भारतीय जनता पक्ष उत्तरोत्तर आणखीन मजबूत होताना दिसतो. आज देशाचे पंतप्रधान विविध राज्याचे मुख्यमंत्री, अनेक आमदार, खासदार हे संघ स्वयंसेवक आहेत. पंतप्रधान मोदीजी संघ प्रचारक होते तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करायचे. अयोध्येतील प्रभू श्रीराम यांचे मंदिर, काश्मीरमधून कलम ३७० हटवणे, सीएए, सामान नागरी कायदा यांच्यासह हिंदुत्वाच्या विचारापासून भाजप भटकत नाही. मुळात राम मंदिर, कलम ३७० हटवणे हि देशातील बहुसंख्य जनतेच्या मनातली सुप्त इच्छा होती जी मोदींनी पूर्ण केली. कम्युनिस्ट, समाजवादी किंवा काँग्रेसी या साऱ्यांचा याच लोकभावेला विरोध आहे. पण भाजप फक्त यामुळेच सत्तेत आहे का? तर याचे उत्तर नाही असे आहे. 


    नेतृत्वहीन काँग्रेस आणि विरोधकांमध्ये मातेक्यता नाही. 

    १९८४ सालच्या निवडणुकीत भाजपचे केवळ २ खासदार निवडून आले होते. खुद्द अटल बिहारी वाजपेयी यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले. पण म्हणून भाजपने आपले संघठन कार्य थांबवले नाही. भाजप आपली संगटना उत्तरोत्तर आणखीन मजबूत करत राहिला. संघाच्या मुशीत तयार झालेले,हिंदुत्वासाठी वाट्टेल तो त्याग करतील असे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत राहिले. काँग्रेसने मात्र या काळात अल्पना संघठन वाढीकडे सफशेल दुर्लक्ष केले. आज तीच गोष्ट काँग्रेससह इतर पक्षांना भोवतीये. दुसरी गोष्ट परिवारवाद. काँग्रेस हा गांधी परिवाराच्या मालकीचा, तृणमूल काँग्रेस – ममता दीदींच्या, बिजू जनता दल – नवीन पटनायक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – पवार कुटुंब, शिवसेना-ठाकरेंचा. लोकांच्या मनात कुठे तरी परिवारवादा बद्दल छुपा असंतोष आहे. जे भाजपाच्या पथ्यावर पडत आहे. त्यात विरोधकांमध्ये एकता नाही आणि प्रत्येक जण सत्तेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेला आहे. इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार आपण होऊ शकत नाही हे लक्षात येताच नितीश कुमारांनी पुन्हा एनडीएची वाट पकडली. बंगालमध्ये ममता दीदींनी आपले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केली.

    शेटजी भटजींकडून बहुजनांच्या पक्षाकडे वाटचाल 

    शेटजी-भटजींचा पक्ष असा पूर्वी भाजपवर शिक्का बसला होता. मात्र सध्या निवडून आलेले उमेदवार आणि मताधिक्य लक्षात घेता देशातील ओबीसी भाजपच्या पाठीमागे ठामपणे उभा असल्याचे दिसून येते. खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घांची म्हणजेच तेली समाजातील आहेत. या खेरीज सामान्य चहावाला कुठलेही राजकीय पाठबळ पाठीशी नाही,हि छबी सुद्धा फायद्याची ठरते. इतकेच नाही तर देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सुद्धा सामान्य परिवारातुन आहेत. सामाजिक दृष्ट्या त्यांची जात सुद्धा मागास प्रवर्गात येते. प्रत्येक राज्याचा विचार करता भाजपने इतर मागास जाती-जमातींना नेतृत्वाची संधी दिली. सोबतच सवर्ण नाराज होणार नाहीत याची काळजी घेतली.  


    टेक्नोसॅव्ही मोदी आणि अचूक टायमिंग 


    देशात कॉम्प्युटर आणण्याच्या राजीव गांधींच्या नीतीचा समाजवादी,डावे आणि भाजपने कडवा विरोध केला होता. मात्र वर्तमानात त्याच काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत साधी वायफाय सुविधा नसते हे वास्तव आहे. दुसरीकडे मोदी आणि त्यांच्या नेतृत्वातील भाजप प्रचंड टेक्नोसॅव्ही झाला आहे. सोशिअल मीडिया बद्दल लोकांमध्ये वाढती क्रेझ लक्षात घेऊन ‘नॅशनल क्रिएटर्स अवार्ड’च्या माध्यमातून मोदींनी देशातील सोशल मीडिया इंफ्लुएन्सर्सना एका मंचावर आणलं. हेच सोशल मीडिया क्रिएटर्स लोकांच्या मातांना इन्फ्लुएन्स करू शकतात. दुसरी गोष्ट मोदींचे फोटो त्यांची फॅशन तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांवर छाप टाकणारे असतात. नॉर्थ ईस्टमध्ये गेले जी ते तिथला पारंपरिक पोशाखा परिधान करतात. महाराष्ट्रात आले कि आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत करतात. या गोष्टी सर्वसामान्यांच्या भावतात. मात्र यात भाजपची सोशल मीडिया टीम किंवा आयटी सेल महत्वाची भूमिका बजावतात. मोदींच्या किंवा इतरांच्या भाषणाच्या शॉर्ट क्लिप, रिल्स, फोटो,कोट्स इत्यादी गोष्टी ट्विटर,व्हाटसप,फेसबुक, इंस्टाग्रामच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवतात. दुसरीकडे राहुल गांधी सतत नकारात्मक बोलतात. मात्र भारतीय समाज आशावादी आहे. नकारात्मक नाही. २०२३च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. त्यावेळी राहुल गांधींनी मोदींचा पनौती असा उल्लेख केला. मात्र त्याच्या दोन दिवसांनी एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यात मोदीजी भारतीय क्रिकेट संघाला पराभवाने खचून जाऊ नका असा धीर देत होते आणि राहूल, मोहोम्मद शमी यांच्या पाठीवर थाप मारून त्यांनी केलेल्या चांगल्या प्रदर्शनाचे कौतुक करत होते. नक्कीच भविष्यात जेव्ह केंव्हा भारतीय संघ चांगले प्रदर्शन करेल तेव्हा मोदींचा भूतकाळातील व्हिडीओ लोकांना आठवेल. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचे योग्य टायमिंग कसे साधायचे हे मोदींना पक्के ठाऊक आहे.       

    लोकांच्या खात्यात थेट मदत 

    खरं तर ‘आधार कार्ड’ हि संकल्पना काँग्रेस सरकारची. पण मोदींनी ती देशात योग्य प्रकारे राबवली आणि लोकांच्या खात्यात थेट मदत जमा होऊ लागली. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने देखील काही प्रमाणात हा प्रयोग केला होता. मात्र त्याला खूपच उशीर झाला. आज शेतकऱ्यांच्या खात्यात थेट ६००० रुपये जमा होतात. त्यासाठी कुठेही खेटे घालावे लागत नाहीत कि कुणाचे पाय धरावे लागत नाहीत. उज्वल भारत, प्रधानमंत्री जनधन योजना,आयुष्मान भारत,प्रधानमंत्री आवास योजना पूर्वी यासारख्या अनेक योजनांचे पैसे पूर्वी ग्रामसेवक किंवा सरपंच मधल्या मध्ये हडप करत असे.मात्र राजीव गांधी म्हणायचे तसे “एक रुपयातले पंच्याऐंशी पैसे मधल्या मध्य हडप होत नाहीत” हा फरक जनतेला उघड्या डोळ्यांनी दिसतो आहे. 

    संघटन वाढ आणि आकड्यांचा खेळ 

    २०१४ च्या महाराष्ट्र विधासभेत २५ वर्षांची युती तोडून शिवसेना आणि भाजप पहिल्यांदा वेगवेगळे लढले आणि सगळ्यांनाच भाजपच्या महाराष्ट्रातील ताकदीची जाणीव झाली. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत २८८ जागांवर काँग्रेस १७० राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ११३ शिवसेनेचे १६० महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाने १४३ तर भाजपचे ११९ उमेदवार उभे होते त्यापैकी काँग्रेसचे ८२,राष्ट्रवादीचे ६२, शिवसेनेचे ४५, मनसेचे १३ आणि भाजपचे ४६ आमदार निवडून आले. मात्र २०१४ मध्ये भाजपने १७८ जागा लढवून १२२ उमेदवार निवडून आणले, शिवसेनेने २८२ जागा लढवून ६३, काँग्रेसने २८७-४२, राष्ट्रवादी २७८-४१ आणि मनसे २१९-०१. पुढे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र लढून देखील भाजपच्या जागा १७ जागा कमी झाल्या तर शिवसेनेच्या ७ जागा कमी झाल्या. मात्र २०१४ ते २०२४ दरम्यान भाजपने महाराष्ट्रा जातीय गणित जुळवून आणण्याच्या दृष्टीने नव-नवे प्रयोग केले. ओबीसींसह मराठा व्होट बँक अधिक घट्ट करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले. उत्तरप्रदेशात योगी सरकारच्या मंत्री मंडळात ३५. १% ओबीसी, १८% ब्राह्मण, १२.९% एस्सी, ११.१%ठाकूर,९.२% वैश्य (बनिया), ५.५% पंजाबी-खत्री,३.७% भूमिहार,शीख १.८%, मुस्लिम १% मंत्री आहेत. थोडक्यत भाजप इतर मागासवर्गाची व्होट बँक पक्की करण्यावर लक्ष केंद्रित करताना दिसतो. याखेरीज निवडणुकीत जसे राजकीय आरक्षण असते, त्याप्रमाणे भाजप कार्यालयीन कर्मचारी,राज्य स्तरावरील संगठना,पक्षीय संघटनेतील पदे इत्यादी ठिकाणी सगळ्या समाजाला संधी देतो. शिवाय तिकीट वाटपाचा निर्णय घेताना स्थानिक पातळीवरील मत विचारत घेतले जाते. आज महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, गुजरात मध्ये भूपेंद्र पटेल, आसाममध्ये हेमंत बिस्वासर्मा, उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ, दक्षिणेत अण्णा मलाई, मध्यप्रदेशात शिवराजसिंग चौहान, असे संगठन वाढ आणि करिष्मा असणारे नेते आहेत. नितीन गडकरी, पियुष गोयल, एस. जयशंकर यांच्यासारखे अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असणारे नेते आहेत. तेजस्वी सूर्या सारखे भविष्यात पक्षाला पुढे घेऊन जातील असे अनेक तरुण कार्यकर्ते आहेत. 

    ४०० पार म्हणजे नक्की काय? 

    थोडक्यात ४०० पार हे मोदींनी कार्यकर्त्यां समोर थोवलेले टार्गेट आहे. देशभारत भाजप अधिक बलशाली करणे हे दीर्घकालीन आणि मुख्य उद्दिष्टय आहे. याचे प्रमुख उदाहरण म्हणजे पश्चिम बंगाल. पूर्वी ज्या बंगाल मध्ये भाजपची ताकद कमी होती,तिथे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने तब्ब्ल १८ जागा जिंकल्या. तर त्याच बंगालमध्ये २०२१च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ७७ आमदार निवडून आणले आश्चर्याची गोष्ट म्हणजे २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे फक्त ३ उमेदवार निवडून आलेले होते आणि तत्पूर्वी २०११ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा एकही उमेदवार निवडून आलेला नव्हता. वर्तमानात संदेशखाली प्रकरणामुळे तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी चांगल्याच बॅकफुटवर गेलेल्या आहेत. त्यामुळे भाजप बंगालमध्ये चांगलीच आघाडी उघडणार यात शंका नाही. अगदी अश्याच प्रकारे दीर्घकाळ काम करून भाजपने पूर्वांचल मधील राज्यांमध्ये कमळ फुलवलं. नॉर्थ ईस्ट मधील ७ पैकी आसाम,मणिपूर,त्रिपुरा अरुणाचल प्रदेश,सिक्कीम या पाच राज्यांमध्ये भाजप सत्तेत आहे. सध्या केरळ आणि तामिळनाडू मध्ये भाजप आपले पाय पसरण्यास सुरुवात करतोय. जसे त्रिपुरा आणि बंगाल मधून विळा कोयता उपटून भाजपाचे कमळ फुलले तसेच येत्याकाळात केरळमधून कम्युनिस्ट हद्दपार होऊन भाजपची सत्ता यायला वेळ लागणार नाही. कदाचित त्याला अजून बराच अवकास आहे. सध्यातरी दक्षिणेत पक्ष बाल्यावस्थेत आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आपल्या पक्षाचे संघटन वाढेल. आपला बूथ मजबूत होईल याकडे भाजपचे बारीक लक्ष आहे. शिवाय पक्षात ताज्या दमाची लीडरशिप कशी निर्माण होईल याबाबत पक्ष नेतृत्व जागरूक आहे.  

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img