More
    Homeमनोरंजन'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट का पाहावा ? 

    ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट का पाहावा ? 

    भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतिकारकांचे खूप मोठे योगदान आहे. १८५७च्या बंडाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याची पहिली ठिणगी पडली आणि १९४६ च्या भारतीय नौदलाच्या उठावामुळे या देशात आपण टिकाव धरू शकत नाही, ही गोष्ट ब्रिटिशांच्या लक्षात आली. परिणामी गोऱ्यांनी हिंदुस्थानातून काढता पाय घेतला आणि १५ ऑगस्ट १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र हे केवळ उपोषण, चरखा आणि अहिंसेमुळे शक्य झाले का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. कारण,भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या अग्निकुंडात कोट्यवधी भारतीयांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, रक्त सांडले, तुरुंगवास भोगला. भगत सिंग,राजगुरू,सुखदेव यांच्या सारखे अनेक तरुण हसत हसत फासावर चढले. काहींना नरकयातनांपेक्षा भयंकर अशी काळ्यापाण्याची शिक्षा भोगावी लागली. मात्र,एका माणसाचे महात्म्य अधोरेखित करण्यासाठी देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या अनेक स्वातंत्र्यसेनानींना बदनाम करण्याचे कारस्थान रचले गेले. अगदी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरदेखील यातून सुटले नाहीत. तात्यासाहेबांसारख्या तेजःपुंज व्यक्तिमत्वावर चिखल उडवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र अभिनेता रणदीप हुड्डा याने स्वातंत्र्यवीरांच्या चरित्रावर आधारित चित्रपट काढून अशा चोख प्रत्युत्तर दिले. तिकीटबारीवरदेखील या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. पण हा चित्रपट प्रत्येक भारतीयाने का पाहावा? याचा ऊहापोह या लेखाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. 

    का पाहावा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट?
    ‘१८५७ चे स्वातंत्र्य समर’ या पुस्तकाबद्दल समाजवाद्यांनी आणि कम्युनिस्टांनी स्वातंत्र्यवीरांचा सन्मान केला होता. त्यावेळी “१९११ पूर्वीच्या सावरकरांचे विचार आम्हाला पटतात त्यानंतरचे नाही, ” असे वक्तव्य एका ज्येष्ठ समाजवादी नेत्याने केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना तात्यासाहेब म्हणाले की,मी लिहिलेल्या पुस्तकाचे महत्त्व पटायला तुम्हाला चाळीस वर्षे लागली. तसेच माझे आताचे विचार समजायला तुम्हाला शंभर वर्षे लागतील. युक्रेन-रशिया किंवा पॅलेस्टाईन- इस्रायल युद्ध पाहता सावरकरांचे विचार काळाच्या पुढचे होते हे लक्षात येते. मात्र,देशात कायमच अहिंसेच्या तत्वाचे नको तितके अवडंबर माजवले गेले. परिणामी चीनने ६२च्या युद्धात ‘हिंदी-चिनीभाई भाई ‘म्हणत हिंदुस्थानच्या पाठीत खंजीर खुपसला आणि अक्साई चीनसह नॉर्थ ईस्टमधील भारताचा बराचसा भूभाग गिळंकृत केला. पाकिस्तानने कायमच काश्मीरसह भारताचे लचके तोडण्याचे प्रयत्न केले. रणदीप हुड्डा दिग्दर्शित आणि अभिनित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहावा तो आपल्या वाट्याला कुणी जाणार नाही याची प्रेरणा घेण्यासाठी.  

    सावरकरांसाठी रणदीपने घरावर नव्हे तर करियरवर ठेवले तुळशीपत्र  

    एखाद्या महापुरुषाचा जीवनपट अवघ्या अडीच-तीन तासात मांडायचा म्हणजे एक शिवधनुष्य पेलण्याप्रमाणे कठीण असते. कारण शंभर-सव्वाशे वर्षापूर्वीचा काळ लोकांपुढे उभा करायचा म्हणजे संशोधन आले. नेमके प्रसंग निवडणे आले. लोकांचा पोशाख,चालण्या-बोलण्याची पद्धत यासाठी मेहनत घ्यावी लागते. नेपथ्य, उत्तम व्हीएफएक्स यासाठी मोठ्याप्रमाणावर खर्च करावा लागतो. तात्यासाहेबांवर चित्रपट बनवताना रणदीप हुड्डाने निर्माता म्हणून कुठेही हात आखडता घेतलेला नाही. प्रसंगी सिनेमासाठी त्याने आपले घर देखील विकले. वास्तविक लव्ह,सेक्स,सस्पेन्स,क्राईम,ड्रमा असा कॉम्बो असलेले कथानक निवडून रणदीप हुड्डा सहजच पैसा आणि प्रसिद्धी मिळवून देणारा सिनेमा बनवू शकला असता. त्यात हिंदू राष्ट्रवादाशी हाडवैर असणाऱ्या डाव्या विचारधारेचा सिनेमा क्षेत्रात पगडा आहे, हे रणदीप चांगलेच जाणून आहे. मात्र तरीही सावरकरांसारख्या हिंदूअभिमानी आणि राष्ट्रवादी विचारांची पायाभरणी करणाऱ्या महापुरुषावर सिनेमा काढून रणदीपने आपल्या करियरवर तुळशीपत्र ठेवले आहे,असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही. कारण,सिनेमाक्षेत्राल्या या लॉबीचा राष्ट्रवाद आणि राष्ट्रवादी विचारांच्या महापुरुषांना विरोध आहे. त्यामुळे बॉलिवूड कडून रणदीप हुड्डाला संपवण्याचे कारस्थान रचले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सावरकर सिनेमाच्या पाठीशी प्रत्येक राष्ट्रप्रेमी व्यक्तीने ठामपणे उभे राहायला हवे. शिवाय हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच पाहायाला हवा. जेणे करून असे आणखीन सिनेमे तयार होतील. 

    चित्रपटाबद्दल काही … 

    यापूर्वी देखील सुधीर फडके यांनी निर्मिती केलेल्या आणि वेद राही यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘वीर सावरकर’ या चित्रपटात सावरकरांची जीवनगाथा मांडण्यात आली होती. मात्र रणदीप हुड्डाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटात पहिल्यांदाच सावरकरांच्या कालखंडाचा वेध घेण्यात आला आहे. शिवाय हा चित्रपट जगभर प्रदर्शित केला गेला. त्यामुळे जगभरातील प्रेक्षकांपर्यंत सावरकरांचे विचार या सिनेमाच्या माध्यमातून पोचवले गेले. जे यापूर्वी कधीही केले गेले नाही. चित्रपटाची सुरुवात हिंदुस्थानात पसरलेली प्लेगची साथ आणि इंग्रजांच्या अत्याचारी राजवट यापासून होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन इंग्रजांशी दोन हात करण्यास सिद्ध होणारे सावरकर.पुढे शिक्षण, कुटुंब,विवाह, लोकमान्य टिळकांची भेट, विदेशी कपड्यांची होळी, इंडिया हाऊस,शामजी कृष्णा वर्मा,मादाम कामा, मदनलाल धिंग्रा ते बोल्शेव्हिक क्रांतीचा जनक लेलीन याची इंग्लंड मधली आणि भगत सिंग यांच्याशी रत्नागिरीत झालेली भेट. सुभाषबाबू आणि गांधीजींसोबतची भेट. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची फाळणीबद्दलची मते,असे इतिहासाच्या ढिगाऱ्याआड लपलेले अनेक प्रसंग या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. 

    सगळ्याच कलाकारांनी आपल्या भूमिकेला न्याय दिलेला आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेने यमुनाबाई सावरकरांची भूमिका खूपच सुंदर साकारलेली आहे. रणदीप हुड्डाला पडद्यावर पाहताना जणूकाही तात्यासाहेब स्वतःच अवतरलेत असा आभास होतो. इतका तो स्वातंत्र्यवीरांच्या भूमिकेशी एकरूप झालेला आहे. हा चित्रपट लेखन,दिग्दर्शन,अभिनय,तांत्रिकबाजू यात कुठेही कमी पडलेला नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सावरकर आणि गांधीजी यांच्यात वैचारिक भूमिकेवरून मतभेद होते. मात्र,या दोन्ही महापुरुषांच्या मनात एकमेकांबद्दल व्यक्तिगत अनादर नव्हता. या सिनेमात देखील तो संघर्ष वैचारिक पातळीपर्यंत मर्यादित ठेवला गेला आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट पाहावा तो यासाठी.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Must Read

    spot_img